आरोग्य विमा : काळाची गरज...

आरोग्य विमा : काळाची गरज...

      भारत हा विकसनशील देश आहे. २०२३-२४ च्या बजेटमध्ये, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी रु. ८९,१५५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. २०२२-२३ बजेटच्या तुलनेत हि तरतूद 13% टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. वरील आकडेवारी नमुद करण्याचा उद्देश एवढाच, देशपातळीवर आरोग्यासंदर्भातील तरतुदीचा विचार जर सरकार करत असेल तर आपणही जागरूक राहून आपल्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन करत असताना आरोग्य विम्याची नक्कीच तरतूद करायला हवी. कोविडने आरोग्य विम्याचे महत्त्व पटवून दिलेले आहेच पण अजूनही बहुतांश नागरिक आरोग्य विम्यापासून दूरच आहेत.

      साखर निर्मितीमध्ये भारत जगामध्ये ब्राझीलनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. रंजक बाब म्हणजे ‘शुगर’च्या बाबतीतही चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. जीवनशैलीतील अमुलाग्र बदलामुळे डायबेटीस, हार्ट अॅटॅक यांसारख्या आजारांचे प्रमाण भारतात वाढू लागले आहेच पण याचबरोबर वाढत्या रासायनिक खतांच्या वापराने कॅन्सरसारखे आजारही बळावले आहेत. अन् या आजारावरील उपचारांचा खर्चही लाखात आहे. बऱ्याचदा पैशांअभावी उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याचे प्रसंगही घडत असतात तर काही वेळेला उपचारांचा खर्च हा बचतीमधील रक्कमेमधून केला जातो. स्मार्टफोनच्या युगात आपणही स्मार्ट बनून काही स्मार्ट निर्णय घ्यायला हवेत व यातील एक स्मार्ट निर्णय आणि पर्याय म्हणजे “आरोग्य विमा”.

      ‘आरोग्य विमा’ म्हणजे एक असा विमा जो आपल्याला आपल्या आपत्कालीन परिस्थितीत, आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खर्चापासून आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करतो. आरोग्य विमा म्हणजेच ‘हेल्थ इन्शुरन्स’ होय. तसेच आरोग्य विम्याला ‘मेडीक्लेम’ सुद्धा म्हणतात.

      आरोग्य विमा घेताना एक साधासोपा नियम पाळणे गरजेचे आहे तो म्हणजे – तुम्ही मेकअपच्या वयात असतानाच आरोग्य विमा घ्यायला हवा अन्यथा चेकअपच्या वयात आरोग्य विमा नसल्याने तुम्हाला खूप अडचणी येतील. कोणताही आजार नसताना किवा लहान वयात विमा घेतल्याचे खूप फायदे आहेत. आरोग्य विम्याचा हफ्ता हा मुख्यतः वयानुसार बदलतो. वय कमी असेल तर हफ्ताही कमी येतो.

      आरोग्य विमा घेताना waiting periods बद्दलही माहीत असणे गरजेचे आहे. आरोग्य विम्यामध्ये विविध plan / policy असतात. आपण आपल्या गरजेप्रमाणे आपल्या विमा प्रतिनिधीकडून माहिती घेऊन plan / policy घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विमा प्रतिनिधीला तुम्ही तुमची संपूर्ण माहिती देऊन तुमच्यासाठी योग्य असणारा plan / policy निवडावी. हा plan / policy निवडताना Waiting periods, Co-payment, Room rent, Restore, Pre-hospitalisation, Post hospitalisation, Cashless hospitals, Reimbursement याबद्दलची माहिती घ्यायला हवी. बऱ्याचवेळेस, आपणही ‘कमीतकमी‘ हफ्ता येईल अशा पॉलीसीची मागणी करतो, त्यावेळेस मग अपूरा अथवा गरजेपेक्षा कमी आरोग्य विमा घेऊन आपण आपलेच नुकसान करून घेत असतो.

      आरोग्य विमा असेल तर मोठ्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होताना तुमच्या पॉलीसीची माहिती देऊन त्वरित उपचार चालू करता येतात. योग्य आरोग्य विमा कवच असेल तर रुग्णालयात अॅडमिट होत असतानाच रूग्णाला बरा कसा होईन या पेक्षा बिल किती होईल याची काळजी राहत नाही व बिलाची चिंता नसल्याने आजारपणातून लवकर बरे होण्यास मदत होते. आरोग्य विमा केल्याने तुमची इतर गुंतवणूक सुरक्षित राहते. आरोग्य विमा पॉलीसी अंतर्गत वार्षिक आरोग्य तपासणी करू शकता आणि निरोगी राहू शकता.

      आर्थिक नियोजनाच्या मदतीने प्रगती करायची असेल तर आर्थिक नियोजनात संरक्षक योजना, बचत आणि गुंतवणूक याचबरोबर आरोग्य विम्याचाही समावेश असायला हवा. आरोग्य विमा ही सध्याच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे त्यामुळे आरोग्य विमा करण्याचा विचार तुम्हीसुद्धा आजच करा.

प्रथमेश सुनिल गायकवाड

(B.LS LL.B)

DHANVI INSURINVEST

8698949944/9890049944